fbpx

माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही- मोदी

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांच्या कुटुंबीयांंसोबत आहे. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे त्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान,आता याच मुद्द्यावरून राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात १५ जवान आणि एक चालक शहीद झाले. या संपूर्ण प्रकारावर गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.