पैलवानांसाठी खुशखबर: थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्तीची संधी

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला असून कुस्तीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच पैलवानांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून तीन वेळा हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवानांची थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मल्लांच्या हिताचे बरेच निर्णय जाहीर केले. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचे प्रशिक्षक काकासाहेब पवार यांनी सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे मल्लांना प्रोत्साहन मिळेल आणि कुस्तीला चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली. उत्तर प्रदेश सरकार मल्लांना ५० हजार रुपयांपर्यंत मानधन देते मात्र आपल्याकडे खूपच कमी मिळत आहे,मात्र हरकत नाही सरकारने मल्लांच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय घेतला त्याचं मी सर्व मल्लांच्या वतीने स्वागत करतो असं पवार यांनी म्हटलं आहे.

– तीन वेळा महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पैलवानांना पोलीस उपनिरीक्षकऐवजी पोलीस उपअधीक्षक करण्यात येईल.
– पैलवानांच्या निवृत्तिवेतनाबाबतचा आराखडा क्रीडा विभागाकडून तयार करण्यात येणार .

– निवृत्तिवेतनासाठी वयाची अट न टाकता हा प्रस्ताव तयार करण्यात येणार .

– पैलवानांचा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश करून त्यांना आरोग्य पत्रिका देण्यात येणार.