‘महिलांवर अत्याचार होऊ नये ही सरकारची भूमिका; भाजपशासित राज्यांमध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे काम’

nawab malik

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवडाभरात बलात्काराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. पुणे, मुंबई, अमरावती आणि ठाणे येथील बलात्काराचे गंभीर प्रकार आता समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विरोधकांनी चांगलेच घेरण्याचा प्रयत्न चालू केला आहे. भाजपने अनेक मुद्यांवर सरकारवर निशाणा साधला आहे.

याला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. ‘महिलांवर अन्याय,अत्याचार होऊ नये ही राज्य सरकारची भूमिका आहे. साकीनाका सारख्या घटनेत सरकार कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही, त्याला वाचवण्याची भूमिका कधीच घेणार नाही. साकीनाक्याच्या घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे

लवकरात लवकरच चार्जशीट दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला शिक्षा करावी, ही राज्य सरकारची भूमिका आहे. महिला सुरक्षेचा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे आणला जात आहे. भाजपच्या लोकांना अशा प्रकारे चुकीचा प्रसार करण्याची सवयच लागली आहे. त्यांनी भाजपशासित राज्यांकडे बघावे. त्या राज्यांमध्ये आरोपींना तेथील सरकार पाठीशी घालण्याचे काम करतेय हे सत्य आहे.’ असा घणाघात मलिक यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या