सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडापर्यंतचा रस्ता आठ दिवसांसाठी बंद

पुणे : पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात ३० जुलै २०१७ रेाजी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर मौजे-घेर सिंहगड हद्दीत घाटातील रस्त्यावर दरड कोसळली असून गडावरील मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. ही घटना सिंहगडावर जाताना धारजाई मंदिराच्या आसपास घडली आहे. यापुर्वी देखील या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्याच्या हंगामात व प्रत्येक शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात.
अशा कालावधीत दरड कोसळल्यास मोठया प्रमाणात जिवित व वित्तहानी होऊ शकते यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम क्र.३४ व ३५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टिने रस्त्यावरील राडारोडा, दरडी हटविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील आठ दिवसांकरिता सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडापर्यतचा रस्ता सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची वनविभागाने काटेकोर अंमलबजावणी करावी. आदेशाच्या अंमलबजावणीत कसुर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.