पालघरमध्ये रिक्षाधारक बेमुदत संपावर

Auto-union

मुंबई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांचे ‘पासिंग’ पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदीवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे.

प्रवाशांचा मोठा भर एसटीला उचलावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले.

त्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे ऑटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय पालघरमध्येच सुरु करावे अशी मागणी केली.