प्रवाशांना रिक्षाचालकांनी सेवा नाकारू नये

पुणे : रात्रीच्या वेळी अनेक प्रवासी अडलेले असतात. ज्येष्ठ नागरिक, महिलांनाही रिक्षासाठी थांबावे लागते. अशावेळी या अडलेल्या प्रवाशांना रिक्षाचालकांनी सेवा नाकारू नये. त्यांना मदत करून प्रवाशांच्या मनात आस्था व आपुलकीची भावना निर्माण करावी, असे आवाहन संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक मठकरी यांनी केले.संपदा सहकारी बँक व श्री गणेश ऑटो टीव्हीएस, स्वारगेट व दापोडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील 25 गरीब, होतकरू व सुशिक्षित बेरोगारांना रिक्षांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत देशपांडे, टीव्हीएसचे सहायक सरव्यवस्थापक अजय गर्जे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर, अध्यक्ष अशोक साळेकर, संदीप बलदोटा, श्री गणेश ऑटोचे अजय दीक्षित, विजय दीक्षित, राजु दीक्षित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.विवेक मठकरी म्हणाले, रिक्षाचालकांसाठी रिक्षा ही लक्ष्मी असते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्या रिक्षाचालकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संपदा बँकेने जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेरोजगारांना रिक्षा आणि त्याचा परवाना मिळाल्याने त्यांना व्यावसायिक म्हणून स्वतःला घडविता येईल. होतकरू व्यक्तींना बँकेच्या वतीने नियमित सर्वतोपरी सहकार्य केले जाते”अजय गर्जे म्हणाले, “बँक, डीलर आणि रिक्षा संघटना एकत्रितपणे काम करू लागल्या, तर अधिकाधिक रिक्षाचालकांना चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. रिक्षाचालकांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षाची रचना काळजीपूर्वक केली आहे” यावेळी प्रामाणिक रिक्षाचालकांचा सत्कारही करण्यात आला. ज्ञानदेव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत खणांग यांनी नियोजन केले. अजय दीक्षित यांनी आभार मानले