विधान परिषद निकाल : कॉंग्रेसच्या पदरी भोपळा, शिवसेना २, भाजप २, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागावर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

दराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४१२ मते पडली असून त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाणे (२१९ मते) यांचा १९३ मतांनी पराभव केला.

परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना २५६ मत पडली त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख (२२१ मत) यांचा ३५ मतांनी पराभव केला. विदर्भात कमळ उमललं असून विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे रामदास आंबटकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केलं. भाजपाचे रामदास आंबटकर यांना ५५० मत मिळाली त्यांनी काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ (४६२ मत) यांचा ८८ मतांनी पराभव केला.

अमरावती मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री प्रवीण पोटे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी देखील काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांना पराभूत करत भाजपचं कमळ फुलवलं आहे. प्रविण पोटे-पाटील (४५८ मत) यांनी काँग्रेसचे अनिल मधोगरिया (१७ मत) यांचा ४४१ मतांनी पराभव केला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे(४२१) विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा(२२१) २०० मतांनी पराभव केला. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे विजयी झालेे.