निकाल लागले, आता सरपंचपदाची आरक्षण सोडत कधी? हसन मुश्रीफ म्हणाले…

hasan mushrif

कोल्हापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आज निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत असून जवळ-जवळ सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले आहेत.

गावागावात विजयी उमेदवार हे जल्लोष साजरा करताना दिसत आहे. तर, यंदाच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच पक्षांच्या नेत्यांनी देखील अधिक सक्रियपणे या निवडणुकांसाठी सहभाग घेतल्याचं दिसून आलं होतं. निकाल लागल्यानंतर आता ग्रामपंचायतीची सूत्र कोणाच्या हातात जाणार हे सरपंचपदाची आरक्षण सोडत झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

यापार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘आज निवडणूक निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती, आता तसं होणार नाही. तर, यामुळे मतदानाची आकडेवारीसुद्धा वाढली आहे, 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे,’ अशी माहिती देखील हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे’ असा टोला देखील त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या