सेनेचा बंडोबा झाला थंडोबा! बंडखोर उमेदवाराने अखेर उमेदवारी घेतली मागे!

shivsena flag

तुळजापूर- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र आता वरनाळे यांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेने अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.

विद्यमान खा. रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने उमरगा व लोहारा तालुक्यात त्याचे मोठे पडसाद उमटले होते. त्यातच रवींद्र गायकवाड यांचे कट्टर समर्थक, उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. माञ रविंद्र गायकवाड यांचा प्रभाव फक्त उमरगा व लोहारा तालुक्यात दिसुन आल्याने शिवसेनेने गायकवाड यांची अपेक्षित दखल घेतली नाही.

त्यातच रविंद्र गायकवाड यांनी उमेदवारी नाकारताच त्यांच्या समर्थकांनी केलेला उपद्व्याप शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने व आ. तानाजी सावंतसह अन्य सेनेचे नेते खंबीरपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहिल्याने रवि गायकवाड समर्थकांच्या बंडखोरीची बेदखल झाली.
माञ रविंद्र गायकवाड यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे, सेनेकडूनही अपेक्षित प्रतिसाद रविंद्र गायकवाड यांच्या समर्थकांच्या बंडखोरीला दिला न गेल्याने सेनेचा बंडोबा अखेर थंड झाला.

प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये अजूनही उमेदवार न मिळाल्याची खदखद असल्याने उमरगा-लोहारा तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रविंद्र सरांची उमेदवारी नाकारल्याने एकनिष्ट शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे.