आज अनुभवायला मिळणार उल्कावर्षावाचा दुर्मिळ आनंद

Meteor-Shower-

टीम महाराष्ट्र देशा – आपण सर्वांनी नुकताच दिपवाळीचा सन आनंदाने साजरा केला. यावर्षी सर्व शाळांमधून मुलांना ‘ फटाकेमुक्त दिपवाळी ‘ साजरी करण्याची शपथ दिली असल्यामुळे काही प्रमाणात का होईना पण यंदाची दिवाळी ही प्रदूषणमुक्त, इकोफ्रेंडली दिवाळी झाली. निदान ती तशी साजरी करण्याकडे तरुण पिढीचा कल दिसला. जागतिक तापमान वाढ आणि दिवसेंदिवस वाढतंच असलेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, आपण आपल्या मनाला मुरड घालून फटाक्यांची आतषबाजी ही थांबवलीच पाहिजे त्याचवेळी आनंद लुटण्याचे इकोफ्रेंडली पर्यायही शोधायला हवेत. ती काळाची गरज आहे. आणि आपणा सर्वांना नभंगणातील नक्षत्रांच्या आतषबाजीचा अलौकिक नजारा पाहण्याची संधी चालून आली आहे.

१७ नोव्हेंबच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होतांना पाहायला मिळणार आहे. रात्री १२ च्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवेल. तेंव्हापासून ते पहाटे पर्यंत आपण हा वर्षाव पाहू शकतो. यावेळी तासाला १५ ते २० उल्का कोसळताना दिसतील. त्यादिवशी आपली पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असलेने हा उल्कावर्षाव घडतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याला फेरी मारून जात असतो. त्यावेळी धुमकेतुमधील काही द्रव्य त्याच्या मार्गावर सांडत असते. त्याला अंतराळातील डेबरीज (कचरा) असे म्हणतात. जेंव्हा पृथ्वी या भागातून पुढे जात असते तेंव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो , तेंव्हा आकाशात एक लखलखीत प्रकाश शलाका चमकून जाते. यालाच ‘लिओनिड्स’ असं म्हणतात.काहीवेळेला तर मोठाले अग्निगोलसुद्धा दिसतात. त्यामुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळेल.

या उल्कावर्षावाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मात्र शहरापासून थोडे दूर, अंधाऱ्या ठिकाणी जावं लागणार आहे. एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर जाता आलं तर अतिउत्तम. घराच्या टेर्रेस वरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरून देखील उल्कापात पाहता येणार आहे. पण तेथून संपूर्ण आकाश मात्र दिसायला हवे.असा हा दुर्मिळ पण तितकाच आनंदाचा आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा योग आज अनुभवायला मिळेल. खगोलअभ्यासकांसाठी तर ही आनंदाची पर्वणीच आहे असं सांगली येथील खगोल अभ्यासक डॉ. एस. व्ही. शेलार यांनी सांगितले.