तुकाराम मुंढेचे एक पाउल मागे

पुणे : विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ आणि त्यामुळे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे विरुद्ध सत्ताधारी असा निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे . तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ यामागे घेण्यास मान्यता दिली. शाळांसाठीच्या बसचा दर १४१ रुपयांवरून ६६ रुपये करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे या दरामधील तफावत पीएमपीला देण्यात येणार आहे.

संचालक मंडळ तसेच शाळांना कल्पना न देता मुंढे यांनी यांनी शाळा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस आधी शाळांसाठीच्या बसच्या दरात प्रतिकिलोमीटर वाढ केली. काही शाळांनी जादा दर स्वीकारून बस सुरू ठेवल्या, मात्र काही शाळांनी बससेवा बंद केली. त्याचा विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला. या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांनी बैठकीसाठी मुंढे यांना बोलावले पण ते या बैठकीला आलेच नाहीत, त्यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता

शुक्रवारी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुंढे, त्रिंबक धारूरकर आदी या बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थी वाहतुकीसाठीचा वाढवलेला दर कमी करण्याची तयारी मुंढे यांनी दर्शवली.