fbpx

भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया सेल सज्ज

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप वाढत आहेत. दिवसेंदिवस संपूर्ण देशात गल्ली ते दिल्ली राजकारणाचा रंग चढत असून, राजकीय पक्ष आता सोशल मीडियावरील युद्धालाही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया विभागही यांस अपवाद नसून, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अधिकृत फेसबुक पेज गेल्या आठ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. या पेजच्या माध्यमातून सोशल मीडिया मार्फत शहर काँग्रेसचे विविध उपक्रम, माहिती , आंदोलने तसेच महापालिका स्तरावर बीजेपीची अपयशी कामगिरी आदी बाबी जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. तसेच राज्य व केंद्र सरकारचे अपयश व काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसने केलेली लोकहिताची कामे हेदेखील जनतेपर्यंत पोहचवले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे असणारे योगदान दर्शविणाऱ्या पोस्ट्स देखील अधूनमधून शेअर केल्या जात आहेत’.

याबाबत अधिक माहिती देताना श्री. पुरंदरे म्हणाले की , ‘२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला व त्याआधारे निवडणुका जिंकल्या. तोपर्यंत काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर फारसा सक्रिय नव्हता, परंतु आता अलीकडच्या काळात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोशल मीडियाचे महत्व कळून चुकले असून आता काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. फेसबुक बरोबरच ट्विटर हँडल्स वरून ट्विट करणे, ट्विटरवर वरिष्ठ पातळीवरून येणारे ट्रेंड्स चालविणे, विविध व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून त्यामार्फत काँग्रेस पक्षाचे विविध विचार, संदेश, कार्यक्रम पोहचविणे आदी उपक्रम सुरू आहेत. तसेच कार्यकर्त्यांसह आता काँग्रेस नेत्यांनाही वरिष्ठ पातळीवरून सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे स्पष्ट निर्देश असल्याने नेतेमंडळी देखील आता स्वतःचे फेसबुक पेज वगैरे सुरू करून जनतेपर्यंत जात आहेत. इन्स्टाग्राम, यु-ट्यूब चॅनेल्स आदी माध्यमांचाही वापर वाढला असून, जसजशा निवडणुका जवळ येतील तसे सोशल मीडिया वॉर रंगेल. मात्र सोशल मीडियाचा वापर करताना कुठेही तणाव निर्माण होणार नाही, चुकीचे संदेश जाणार नाहीत किंवा त्याद्वारे अफवा पसरविल्या जाणार नाहीत याकडेही आमचे कटाक्षाने लक्ष असल्याचे पुरंदरे यांनी आवर्जून सांगितले.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शहर काँग्रेस सोशल मीडिया सेलने बूथ लेव्हलपर्यंत रणनीती आखल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अभिजित सपकाळ व शहराध्यक्ष श्री. रमेश बागवे यांचेही याबाबत मोलाचे मार्गदर्शन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मिडीयावर सक्रिय असाल तरच मिळणार कॉंग्रेसचे तिकीट

जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी – गृहमंत्रालयाचे बंदी