जाळीचा देव येथील सरपंचपद निवडीची प्रक्रिया तूर्तास स्थगित; वाढत्या कोरोना रुग्णसंख्यमुळे प्रशासनाचा निर्णय

जालना : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे तहसीलदारांचे नियोजन होते. मात्र, गावात ४ दिवसांत ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले. त्यामुळे सपंचपदाची निवड प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र जाळीचा देव येथे चक्रधर स्वामींचे जागृत स्थान आहे. त्यामुळे याठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून भक्त, अनुयायी दर्शनासाठी येतात. १५ दिवसांपूर्वी आश्रमातील एका महंतास कोरोनाची लागण झाली होती. धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तेथील अनुयायांच्या कोरोना चाचण्या केल्या त्यात २३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गावात बंद करण्यात आले आहे. शिवाय सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाची चार पथकेही तैनात करण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील सरपंच सखुबाई आंबेकर या तीन वर्षांपूर्वी जनतेतून निवडून आलेल्या होत्या. १२ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरोधात तहसीलदार संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव पारितही झाला. दरम्यान, एका महिन्याने ११ डिसेंबर रोजी पुन्हा सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान घेण्यात आले. त्यातही सरपंच सखुबाई आंबेकर यांच्याविरुद्ध जनतेने मतदान केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. परिणामी येथील सरपंचपद रिक्त होते. यासाठी २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे तहसीलदारांचे नियोजित होते. मात्र, कोरोनाचा या ठिकाणी मोठा कहर झाल्याने ही निवड प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यना, संरपंचपदाची निवड प्रक्रिया तूर्तास थांबवण्यात आली असली तरी मागील वेळी थेट जनतेतून सरपंचपद निवडण्यात आले होते. आताही हीच प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. सोमवारी जाळीचा देव येथील आरोग्याचा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओ कल्पना क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार संतोष गोरड आदींनी गाव पाहणी करून जाणून घेतला.

महत्वाच्या बातम्या