वाधवान कुटुंबामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, गृहमंत्र्यांच्या चौकशीची आणि राजीनाम्याची मागणी

पुणे : महाबळेश्वर येथे जिल्हा प्रवेश बंदी आदेश मोडून मंत्रालयातून परवानगी घेऊन आलेल्या उद्योगपती व कुटुंबीय,कर्मचाऱ्यांवर वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतरांच्या जीविताला धोका होऊ शकतो. असे असतानाही हयगय व घातकीपणाची कृती करून ते महाबळेश्वरमध्ये आले. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे भा. द. वि. कलम १८८, २६९, २७०, ३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन सातारा जिल्हा प्रवेश बंदीचा आदेशाचा भंग करून मुंबईतून महाबळेश्वर येथे आलेल्या उद्योगपती व त्याच्या कुटुंबियांसह तेवीस जणांवर सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाई केली आहे. कपिल वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, शत्रुघ्न घाग, मनोज यादव, मनोज शुक्ला, अशोक वाफेलकर, दिवाण सिंग, अमोल मंडळी, लोहित फर्नाडिस, जसप्रीत सिंग, जस्टिन दिमीलो, इंद्रकांत चौधरी, एलिजाबेथ आयपिलाई, रमेश शर्मा, प्रदीप कांबळे, तारका सरकार यांच्यासह लहान मुलांचा सहभाग असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

झालेल्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी किंवा विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे गृहखात्यावर सडकून टीका होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात,पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोपी DHFL समुहाचे वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्यानी त्यांना विशेष सवलत दिली. गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मी मागणी करतो.