fbpx

लोकसभेचा निकाल एक दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यावेळी देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार असून, २३ मे ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. परंतु यावेळी मात्र निकाल १ दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातून विरोधक एकवटले आहेत. त्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ईव्हीएम (इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन) व व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये किमान ५०% मशीन्सची तपासणी करण्यात यावी असा उल्लेख आहे. या याचिकेसाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २१ विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पाठींबा आहे.

या याचिकेवर १ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी करुन निकाल जाहीर करण्यासाठी ४-६ तासांचा वेळ लागतो. जर सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांच्या बाजूने निकाल दिला तर मतमोजणीसाठी अधिक वेळ लागु शकतो. त्यामुळे लोकसभेचे निकाल जाहीर होण्यासाठी २४ मे उजाडू शकतो. त्यामुळे यावेळेस लोकसभेचे निकाल जाहीर होण्यास एक दिवस विलंब होण्याची शक्यता आहे.