fbpx

…तर कोट्याधीश असणारे सुजय विखे होणार पराभूत ?

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चर्चा या ना त्या कारणाने सातत्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात होत असते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यापासून ते या पक्षातून त्या पक्षात नेत्यांचे जाने असो की, शरद पवार यांच्या हट्टाने विखेंची नाराजी असो, यासह अनेक घडामोडी झाल्या आणि पुढे सातत्याने होताना दिसत आहेत.

किती आहे डॉ. सुजय विखे यांची संपत्ती ?

आता भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील चर्चेत आलेत ते त्यांच्या संपत्तीच्या विवरणामुळे आले डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत. तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नीकडे मात्र प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे. विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदविले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न 86 लाख 10 हजार 202 इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 42 हजार इतके आहे. या दोघा पती-पत्नींवर एकही गुन्हा दाखल नाही. सुजय विखे यांच्याकडे केवळ 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड आहे. पत्नीकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे. सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत. सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.

काय आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघांचे राजकारण ?

राष्ट्रवादीकडून आ. अरुण जगताप, प्रताप ढाकणे, प्रशांत गडाख, दादा कळमकर, अनुराधा नागवडे, निलेश लंके यांची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आग्रहाखातर मा. महापौर व नगर शहराचे विद्यमान आ. संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. आ. संग्राम जगताप तरुण व आक्रमक नेतृत्व आहे, त्याचबरोबर ते भाजपाचे आ. शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. आ. कर्डिले यांची नगर जिल्ह्यात किंगमेकर अशी ओळख आहे, राष्ट्रवादीने कर्डिले जगतापांना मदत करतील या उद्देशानेच जगतापांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर आ. जगतापांचे नगर जिल्ह्यात असलेले सर्वपक्षीय नाते संबंध ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. बलाढ्य सुजय विखेंच्या विरोधात तरुण आमदार संग्राम जगताप यांना दिलेली उमेदवारी हा राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. त्यामुळे नगर दक्षिण मध्ये पुन्हा एकदा पवार-विखे संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल. तर सुजय विखे हे मूळचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असल्याने आम्हाला ‘उपरा’ उमेदवार नको अशी मोहीम विरोधकांनी सुरु केली आहे.

‘या’मुळे सुजय विखेंना निवडणूक जाणार जड

विखे यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असून सहा पैकी चार आमदार हे युतीचे आहेत ही त्यांची जमेची बाजू असली तरी, जुने भाजप कार्यकर्ते विखेंना किती साथ देतात हेही महत्त्वाचे आहे. तसेच दिलीप गांधी यांची नाराजी दुर करण्यात विखे यशस्वी होतात की नाही हेही पाहणे महत्वाचे ठरेल. तर सुवेन्द्र गांधी यांचे बंड डॉ. सुजय विखेंची डोकेदुखी वाढवत असून. याचा उपचार स्वत: डॉक्टरांकडे देखील दिसत नाही. तर दुसरीकडे अहमदनगरचे किंगमेकर शिवाजी कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप यांना शेवटच्या टप्प्यात मदत करणार अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात रंगत असल्याने विखेंना ही निवडणूक वाटती तितकी सोपी दिसत नसल्याने, सुजयचा विजय नक्की कसा होणार आणि विखे गणित कसे जुळवणार याकडे नगरचेच नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे.