राज्यभरात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता

पुणे : राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार असून येत्या दोन दिवसात तापमानात मोठी घट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, पुणे शहरात तापमानात घट झाली आहे. शहरात आज 13.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडीची लाट आता पुन्हा येणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही काळ राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पण आता हा पट्टा विरुन गेला असल्याने राज्यात थंडी सुरू होईल.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्यात अन्य ठिकाणी तापमानात कोणताही बदल झालेला नाही. आगामी काळात राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले.

सध्या उत्तरेत थंडीची तीव्र लाट आहे. त्यामुळे राज्यातसुद्धा पुन्हा थंडी वाढणार आहे. उत्तरेत अनेक ठिकाणी तापमान हे 10 अंशांपेक्षा खाली घसरलेले आहे. त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सध्या किमान तापमानात घट झाली नसली, तरी गार वाऱ्यामुळे थंडी जाणवत होती. येत्या दोन दिवसांत शहरातील किमान तापमानात घट होऊन आकाश निरभ्र राहणार आहे

Comments
Loading...