सिद्धेश्वर वनविहारात झाली ‘प्लॅस्टिकमुक्त’ मोहीम

सोलापूर : सकाळची रम्य प्रहार, कुणी हातात पोती घेऊन फिरत होता. तर काहीच्या नजरा या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्यांना शोधत होत्या. जिथे जिथे प्लास्टिकच्या वस्तू आढळतील त्या उचलून पोत्यात टाकण्यात येत होत्या. निमित्त होते सिद्धेश्वर वनविहार प्लास्टिकमुक्त करण्याचे. रविवारी सकाळी सिद्धेश्वर वनविहारात पर्यावरणाच्या रक्षणासाठी झपाटलेल्या तरुणांनी एकत्र येऊन प्लास्टिकमुक्तीची मोहीम राबवली. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी आठच्या सुमारास अभियानाला सुरुवात झाली. निसर्ग परिचय केंद्राजवळच्या परिसरात हे अभियान राबवण्यात आले. या वेळी सुमारे ते पोती प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. यात दारूच्या बाटल्या गुटख्यांच्या पाकिटाचे प्रमाण जास्त हाेते. मागील रविवारपासून नेचर काॅन्झर्वेशनच्या वतीने अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्या माधुरी चालुक्य यांनी पर्यावरणाचे रक्षण संवर्धन यावर मार्गदर्शन केले. या वेळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे शिवानंद हिरेमठ, तरुण जोशी, पप्पू जमादार, शुभम अक्षंतल, सुमेध गोलकोंडा, इम्राण पठाण, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ, विनय गोटठे, शुभम बाबानगरे, तसेच सहा वर्षांची माही जोशी ही देखील मोहिमेत सहभागी झाली होती. शिवाय माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या नागरिकांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.