वर्धा वासियांनी अनुभवली अवघ्या 15 वर्षांच्या निकेतनची अनोखी सफारी

vardha

वर्धा : स्थळ राधिका हॉटेल पुढील रस्ता… एका पाटीला चारचाके … त्यावर एक कोवळं लेकरू… त्याच्या हातात स्टेअरिंग… मध्येच पिकपिक अन् खडकन काहीतरी उसळल्याचा आवाज… तो आपल्या धुंदीतच शान की सवारी करीत ऐटीत चालला… जणू या रस्त्याच्या राजाच तो… लहान लेकरांची गुडगुडी धावावी असे एक मशीन रस्त्याहून धावत होते… लोक त्याच्याकडे पाहत होते… न राहवता त्याला रस्त्याच्या कडेला थांबवले आणि चक्क 15 वर्षाच्या या बालकाने केलेला अविष्कार थक्क करणाराच ! जुन्या शिलाई मशीनच्या लुपिंगचे अ‍ॅक्सीलेटरची , मारूती सुझूकीचे स्टेअरिंग, घरात लावण्यात पडद्याचे लोखंडी पाईप आणि दोन 24 व्होल्टच्या बॅटरी बस्स ! तासाला 25 ते 30 किलोमिटर धावणारी कार बनवली येथील लक्ष्मीनगर परिसरातील निकेतन नरेंद्र सोमनाथे या विद्यार्थ्याने.

स्थानिक अग्रग्रामी हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात असलेला निकेतन आठवीपर्यंत सेन्ट अँनथनीचा विद्यार्थी होता. शाळेतील प्रत्येक विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घ्यायचा आणि हमखास बक्षीस पटकावणाऱ्या या निकेतनने कोरोनाच्या काळातील संचारबंदीचा अभ्यासासोबतच कार करण्यासाठी उपयोग करून घेतला. शाळेतील कोण्यातरी मित्राने बॅटरीवर सायकल चालवल्याचे त्याने बघितले आणि तल्लख बुद्धीच्या अनिकेतला कार उभी करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्याने मजबूत तळ तयार करण्यासाठी लोखंडी अँगलची जमवाजमव केली. त्यावर प्लायवूड बसवले. लहान मुलांच्या सायकलचे चार चाकं लावले. चार पायांवर उभा झालेल्या या डोलार्‍याला 12-12 व्हॉल्टेजच्या दोन बॅटरी लावल्य.

आता ते यंत्र जागच्या जागी फिरू लागले. मात्र, रस्त्यावर धावण्यासाठी त्याला अ‍ॅक्सीलेटरचीगरज होती. त्यासाठी विजेवर चालणार्‍या  शिलाई मशीनचे लुपिंग लावल्याने प्लायवूडवर तयार करण्यात आलेली कार आता पुढे धाऊ लागली होती. मात्र, त्या कारला सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेअरिंगची गरज होती. त्यासाठी जुन्या मारोती कारचे स्टेअरिंग मिळवले. मात्र, ते आता लावायचे कसे तर घरात लावण्यात आलेल्या पडद्याचा लोखंडी पाईप काढून त्यात स्टेअरिंग लावले.

तर आता कार वळण्यासाठी पुन्हा काही साहित्याचे गरज होती. त्यात पुन्हा शिलाई मशीनचे चाक पायडलने फिरवण्यासाठी मदत करणारी लोखंडी सळाख स्टेअरिंगने पुढील दोन्ही चाकं वळवण्याच्या कामात आणली असल्याचे त्यांने सांगितले.या कारला आतापर्यंत 6 हजार रुपये खर्च आल्याचे निकेतन म्हणाला. आतापर्यंत आपण सोलर अ‍ॅग्रीकल्चर रोबोर्ट, पिप्यातील कुलर, रिमोटवरील लाकडी नंदीबैल पोळ्यात आकर्षण ठरला होता.

आपण यापूर्वी ड्रोनही तयार केला असल्याचे तो म्हणाला. आता रस्त्यावर धावणारी ही कार भविष्यात शेतकर्‍यांना फवारणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल यासाठी आपण प्रयोग करणार असल्याचे त्याने सांगितले. ही गाडी आता पट्ट्यावर लावून मोठे चाकं बसण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चाकं उंच आणि सोलर विजेरीची क्षमता वाढवल्यास 100 लिटरचा ट्रम ठेवून शेतात फवारणी करणे शक्य होईल, असा विश्‍वास निकेतन सोमनाथे याने व्यक्त केला. यासाठी आपल्याला सिव्हील इंजिनिअर असलेला मोठा भाऊ अनिकेत मार्गदर्शन करीत असल्याचे त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-