निष्ठावंतांच्या पदरी निराशाच ; उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर ?

मुंबई: राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी नाव निश्चित झालं असल्याचं बोललं जातंय.या यादीत असलेल्या नावांमध्ये आता नवीनच नाव समोर येत आहेत आणि त्यात निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याचे चित्र आहे.प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

कॉंग्रेसतर्फे नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, सत्यजित तांबे, आशिष देशमुख, चारुलता टोकस, रजनी पाटील ही नावं चर्चेत आहेत. ऐनवेळी उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आल्याने मात्र या वेळी तरी कॉंग्रेस सचिन सावंत यांच्या सारख्या तडफदार प्रवक्त्याला आणि मोहन जोशी यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्यांना संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर शिवसेनेतर्फे सुनील शिंदे,आदेश बांदेकर,सचिन अहिर,शिवाजीराव आढळराव-पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासोबत राहुल कनाल हे युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आहे.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे एकनाथ खडसे,शिवाजी गर्जे,आदिती नलावडे,सूरज चव्हाण,राजू शेट्टी,आनंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. देशात एकूण ७ राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.

महत्वाच्या बातम्या