मास्क लावण्यास सांगितल्याने वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना राबविणे सुरू केल्यात. याच अनुषंगाने बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र, केजमध्ये या कारणामुळे वाहकाला प्रवाशांकडून मार खावा लागला आहे. वाहकाने बसमधील प्रवाशाला तोंडाला मास्क लावण्यास सांगितले असता प्रवाशाने शिवीगाळ करीत वाहकाला बसमध्ये खाली पडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ही घटना माजलगाव -सोलापूर बसमध्ये केज शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर शनिवारी घडली. याप्रकरणी त्या प्रवाशाविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, माजलगाव आगारातील चालक अंकुश रामभाऊ चव्हाण व वाहक नारायण बाळू पवार (४६, रा. समता कॉलनी माजलगाव) हे दोघे शनिवारी सकाळी ८.४५ वाजता माजलगावहून माजलगाव-सोलापूर ही बस (एम. एच. २० बीएल २१५३) घेऊन सोलापूरला निघाले होते. सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास केज बसस्थानकातून बसलेल्या सूरज विठ्ठल गुरव (रा. विठ्ठलनगर, केज) या तरुण प्रवाशाला वाहकाने तोंडाला मास्क लावण्यास सांगितले.

यावरून सूरज गुरव याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या का देता, असे म्हणताच सूरज याने वाहक पवार यांच्या तोंडावर-हातावर चापटबुक्क्याने मारहाण करीत त्यांना बसमध्ये खाली पाडले. यानंतर पायावर लाथा मारत मुका मार दिला. इतर प्रवाशांनी सोडवासोडव करीत बस केजच्या पोलिस ठाण्यात आणली. वाहक नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवासी सूरज गुरव याच्याविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या