पक्षाने मला सांगितलंय बारामतीत जाऊन राहा : चंद्रकांत पाटील

पुणे : ‘पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहाच्या दहा जागांवर आमचे विशेष लक्ष आहे. शरद पवारांचे राजकारण जातीय आणि फोडाफोडीचे आहे. तसेच पक्षाने मला सांगितले आहे की, बारामतीत जाऊन राहा. मागच्या निवडणूकीपेक्षा आता समीकरणे बदललेली आहेत. काँग्रेस राज्यात उरलेली नाही, ती कोणी संपवली यावर चर्चा होऊ शकते, असेही पाटील म्हणाले.

भाजपचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पाटील बोलत होते.

यावेळी सर्व ज्येष्ठ नेते व मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आधी बारामती हातात येऊ द्या, मग पुढचे लक्ष्य ठरवू’ असेही म्हटले.

पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु सक्षम उमेदवार ठरवता आला नाही. अगदी शेवटच्या दिवशी कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला. तर दुसरीकडे सांगली लोकसभेला वसंतदादांच्या नातवाला स्वाभिमानीची बॅट हातात घ्यावी लागली आहे, अशाप्रकारे काँग्रेसची सध्याची हालत आहे, अशीही टीका पाटील यांनी केली.