पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; संजय काकडेंच्या गर्जनेनंतर शिरोळेंचा सावध पवित्रा

 

पुणे: भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुणे लोकसभेसाठी रेसमध्ये असल्याचं उगडपणे जाहीर केलं आहे, त्यानंतर विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मी 2019 साठी उत्सुक आहे. पण आपण पक्षाचे सैनिक असून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याची प्रतिक्रिया शिरोळे यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक आपण भाजपच्या तिकिटावर पुण्यातून नक्कीच लढणार असल्याचा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते. संजय काकडे यांनी स्वतःच आपण लोकसभेच्या रिंगणात असल्याचे जाहीर केल्याने आता निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काकडे यांनी चमत्कार करत भाजपला सत्तास्थानी आणले. त्यानंतर काकडे यांच्यावर मुख्यमंत्री देखील खुश असल्याचे दिसत आहेत. दरम्यान मध्यंतरी खासदार अनिल शिरोळे आणि काकडे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे एकेकाळचे पुण्याचे किंगमेकर समजले जाणारे सुरेश कलमाडी यांच्याशी देखील काकडे यांची बैठक झाली होती. तसेच आरपीआय अध्यक्ष केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत काकडे यांनी डिनर डिप्लोमसी देखील केली. त्यामुळे सर्व बाजू चाचपडून काकडे यांनी आपण लोकसभेच्या रेसमध्ये असल्याचे जाहीर केल्याचं दिसत आहे.

आपण आजवर पक्षासाठी केलेले काम पाहता पक्ष नक्कीच आपला विचार करेल असा विश्वास देखील काकडे बोलून दाखवत आहेत. तसेच 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप उमेदवार साडेतीन लाखांच्या मतांनी विजयी होणार असल्याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली आहे. तर पंतप्रधान पदाचे दावेदार शरद पवार हे जरी पुण्यातून लढले तर आपल्याला त्यांच्या विरोधात लढायला आवडेल असेही काकडे म्हणाले.