fbpx

शरद पवारांच्या आदेशाला युवती अध्यक्षांचा खो, पुणेरी पगडी घालत मोडला पक्षाचा आदेश 

पुणे: मागील वर्षी पुण्यामध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना फुले पागोटे घालत यापुढे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तसेच सर्व कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी चा वापर न करता फुले पगडी वापरावी असे आदेशच भर सभेत दिले होते. यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात तफुले पागोट्याचा वापर केला जात आहे. तर इतर कार्यक्रमांमध्ये देखील पुणेरी पगडीला कटाक्षाने टाळले जाते. मात्र पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सक्षणा सलगर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये पुणेरी पगडी परिधान करत शरद पवार यांचा आदेश मोडल्याचं दिसत आहे.

हल्लाबोल सभेमध्ये शरद पवार यांनी छगन भुजबळ यांची पुणेरी पगडी हटवत फुले पागोटे घातल्यानंतर पुण्यामध्ये मोठा वाद रंगला होता. पुणेरी पगडी ही पेशवाईचे प्रतीक आहे त्यामुळेच पवार यांनी सर्वाना फुले पागोटे वापरण्यास सांगितल्याचं म्हणत पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्षाध्यक्षांच्या आदेशाचे पालन करत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात पुणेरी पगडी आकारानुसार बांधण्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनला देखील राष्ट्रवादी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.

दरम्यान युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सक्षणा सलगर यांनी एका सत्कार समारंभात पुणेरी पगडी परिधान केल्याचा फोटो सध्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये फिरत आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांच्या आदेशाचं पालन करत असताना प्रमुख पदाधिकारी असणाऱ्या सलगर यांनी घेतलेल्या पुणेरी पगडीमुळे अनेकांचे डोळे उंचावले आहेत.

महाराष्ट्र देशाशी बोलताना सक्षणा सलगर सारवा सारव करत म्हणाल्या, ‘मी पवार साहेबांच्या विचारांना मानणारी आणि त्याप्रमाणे आचरण करणारी कार्यकर्ता आहे. पुणेरी पगडी ही पेशवाईच्या राजवटीची प्रतिक असल्याने आम्ही सर्व कार्यक्रमांत समतेचे प्रतिक असणाऱ्या फुले पगडीचा वापर करतो. पुण्यातील सत्कारावेळी केवळ जेष्ठ समाजसेवक कुमार सप्तर्षी यांचा माण राखण्यासाठी मी पुणेरी पगडीचा स्वीकार केला. मात्र लगेच ती काढून टाकली.’