मंत्रिमंडळ विस्तार : यावेळेस तरी महेश लांडगेंना मिळणार का संधी ?

टीम महाराष्ट्र देशा : जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हे फेरबदल २३ मे ला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.अशातच जर गिरीश बापट हे पुण्यातून विजयी झाले तर बापटांच्या जागी महेश लांडगे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी पक्षवाढीसाठी मोठे काम केले आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सहकार्य केले होते. त्यामुळे त्यांचे काम पाहता त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील दोन मंत्रिमंडळाच्या विस्तारात महेश लांडगे यांना मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता होती परंतु दोनही वेळेस त्यांना डावलण्यात आले होते, तसेच लक्ष्मण जगताप यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व लोकसभेच्या निकालांवर अवलंबून आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचीही भाजपच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.