देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ

देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ

भुजबळ

जळगाव – ओबीसी आरक्षणासाठी राज्यसरकार न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी हक्क परिषद ते बोलत होते. यावेळी यापुढे जनगणना करतांना जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव ओबीसी आरक्षण हक्क परिषदेत मंजूर करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, आमदार कपिल पाटील, आमदार अनिल पाटील, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्ष आणि आयोजक प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार रामहरि रुपनवर,डॉ. ए. जी. भंगाळे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, संतोष चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, फारुख शेख, कलिम सराल, पंकज महाजन, विष्णू भंगाळे, अशोक पवार, सतीश महाजन, रवी देशमुख, अमित पाटील, विवेक जगताप, संतोष पाटील, नारायण वाघ, संजय महाजन, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नावर बोलले की लगेच त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्याचे प्रकार सद्या देशात होताय. त्यामुळे बोलणाऱ्यानी सावध रहा असे सांगत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. देशातील साडेसात हजार जातींना एकत्र करण्याचे महान काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. प्रत्येक जातीच्या वेगळ्या संघटना असल्या तरी जोपर्यंत सर्व एकत्र येणार नाही तो पर्यंत आपली ताकद दिसणार नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे जे आहे ते आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी एकसंघ होऊन ही लढाई लढावी लागेल.

ओबीसी हक्क परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे. मंडल निघाला तेव्हा लगेच कमंडल बाहेर पडले अशी टीका त्यांनी केली. खाजगी क्षेत्रातही ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मांडली. आणि आज जळगावच्या ओबीसी हक्क परिषदेत आरक्षण आणि जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव मांडण्यात आला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले पाहीजे.

ओबीसींच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी आहे.सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्यात येईल. जनतेची साथ आपल्यामागे असल्याने छगन भुजबळ कुणालाही घाबरणार नाही. गोरगरिबांसाठी सुरू असलेला हा संघर्ष आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहील, संघर्ष थांबणार नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. स्त्री पुरुष हा भेदभाव निर्मिकाने केलेला नाही. जाती धर्माचा भेद त्यांनी केला नाही तो व्यवस्थेने निर्माण केला कुठल्या जातीला नाही तर मनुवादाला आपला विरोध आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आरक्षणाची ही लढाई संपलेली नाही.आपली जेवढी शक्ती वाढेल तेवढ्या अडचणी कमी होतील. देशातील न्याव्यवस्था जिवंत आहे तो पर्यंत कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या