बलात्काऱ्यांना वाचवणे हाच महाराष्ट्र सरकारला एकमेव उद्योग राहिलाय : चित्रा वाघ

वाघ

पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. याप्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ मुख्य आरोपी म्हणून संजय राठोड यांचे नाव घेत आरोप करत आहेत.

संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय. अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही. तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

यावेळी पत्रकारांनी चित्रा वाघ याना प्रश्न विचारला कि, अश्या प्रकरणामध्ये सामान्य नागरिकनांची लगेच चौकशी होते मग मंत्र्यांची लगेच चौकशी का केली जात नाही? यावर चित्रा वाघ म्हणाल्या, मंत्र्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. बलात्कार्यांना वाचवणे हाच महाराष्ट्र सरकारला एकमेव उद्योग राहिलाय असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या