fbpx

आमचे जो नुकसान करण्याचा प्रयत्न करेल त्याला तसेच चोख प्रत्युत्तर दिले जाईल : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने सत्ताधारी पक्षाचे नेते देशवासीयांच्या सतत चर्चेत आहेत. तर आज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानकडून सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू येथे जनसमुदाया समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदन हा तामिळनाडूचा असल्याने आज प्रत्येक नागरिकाला गर्व होत असल्याचं म्हंटल आहे.

२६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्या नंतर भारताकडून कोणतीच कारवाई केली गेली नाही, पण आता देश अशा परीस्थितीत लाचार होणार नाही. २००४ ते २०१४ पर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले, त्यावेळी देशाला या हल्ल्यांच्या प्रत्युत्तराची अपेक्षा होती पण त्यावेळी काहीच करण्यात आलं नसल्याचं मोदी म्हणाले.

उरी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या बहादूर जवानांनी काय करून दाखवलं हे आपण साऱ्यांनी पाहिलं, तसेच पुलवामा हल्ल्यानंतर देखील आपले जवान त्यांना पुरून उरले. मी ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली त्या सर्व जवानांना मी सलाम करत असल्याचं मोदी म्हणाले.

भारताने आतापर्यंत अनेक दहशतवादी कारवायांना आळा घातला आहे. आजचा भारत हा नवीन भारत आहे , त्यामुळे आम्हाला जो नुकसान करण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही नेहमीच त्याच स्वरूपाचे प्रत्युत्तर देवू. असा इशारा देखील मोदी यांनी यावेळी दिला.