ओबीसी समाजानेच आता या सरकारला दणका द्यायला हवा – चंद्रकांत पाटील

chandrakant patil vs mva

पुणे : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने केले.

आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसी समाज बांधवांसोबत विश्वासघात करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मविआ सरकारविरुद्ध भाजपाने राज्यभरात प्रखर आंदोलन सुरू केले आहे. आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसी समाजानेच आता या सरकारला दणका द्यायला हवा,’ असं पाटील यांनी ओबीसी समाजाला आवाहन केलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘आपल्याला आता भाषण बंद आणि संघर्ष सुरू करावा लागणार आहे. फडणवीस सरकारने दिलेले २७% आरक्षण या मविआ सरकारने समाप्त केलं. वारंवार या सरकारने ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यभर आमचा संघर्ष सुरुच राहणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ज्या ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार नाहीत असे जाहीर केले होते, आता तेच सरकार ओबीसी आरक्षण नसताना निवडणुका घेत आहेत. देवेंद्रजी यांनी ५ मार्चला विधानसभेत इम्पेरिअल डेटासंदर्भात सूचना करूनसुद्धा या सरकारने वेळकाढूपणा केला,’ असा घणाघात पाटील यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या