‘हार्वे’ चक्रीवादळातील मृतांचा आकडा 44 वर, तेलगू नागरिकांना सर्वाधिक आर्थिक फटका

वॉशिंग्टन : टेक्सास आणि लुसियाना प्रांतांतील ‘हार्वे’ चक्रीवादळातील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या वादळामुळे १६० दशलक्ष अमेरिकी डॉलरचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

२० जण अद्यापही बेपत्ता असल्याचे ह्यूस्टन पोलीस प्रमुख आर्ट अॅसेव्हेडो यांनी सांगितले. ‘हार्वे’ चक्रीवादळाचा पहिला तडाखा टेक्सास प्रांताला बसल्यानंतर बुधवारी लुसियाना प्रांतामध्ये या वादळाचा फटका बसला.

‘हार्वे’ वादळामुळे अमेरिकेत पहिल्यांदाच सर्वाधिक पाऊस पडल्याने येथे पूरस्थिती निर्माण झाली. हार्वे वादळामुळे सर्वाधिक आर्थिक फटका तेथील तेलगू नागरिकांना बसला आहे. ग्रेटर ह्युस्टनमध्ये बहुसंख्य तेलगू नागरिक राहतात. कॅटी, शुगरलँड, सायप्रस आणि बेलायरमध्ये १० हजार तेलगू कुटुंबे वास्तव्यास आहेत.