मुंबई : “महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या २०२४ सालच्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी एक ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसायला हवा अशी आमची इच्छा आहे, त्याकरिता भाजपाला आम्ही पूर्ण समर्थन करणार,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले यांनी मिरा रोड येथील बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात आठवलेंनी हे विधान केले आहे.
राज्यात शिवसेना पक्षाने चुकीचे पाऊल उचलून, राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सरकार बनवले आहे. मात्र आता हे सरकार येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येणार नाही. त्यावेळी भाजपा व आरपीआय बहुमताने सरकारमध्ये येणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी आठवले यांनी, ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसावा याकरता आपले पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडवणीस योग्य व्यक्ती असून, ते बहुजन समाजाबरोबर मराठा समाजाचे देखील नेते आहेत, असेही आठवले यांनी म्हंटले. देवेंद्र फडणवीस यांनी बौद्ध धर्माचा ‘भगवा’ रंग स्विकारला आहे. हा भगवा शांततेचा प्रतीक असून त्यानुसार फडणवीस राज्यात शांतता स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतील, असे आठवलेंनी सांगितले.
तसेच आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. “राज ठाकरे हे हिंदू असल्यामुळे त्यांनी नक्कीच अयोध्या दौरा केला पाहिजे. मात्र हा अयोध्या दौरा करण्यापूर्वी उत्तर भारतीय नागरिकांची राज यांनी माफी मागावी, त्यानंतरच अयोध्या दौरा करावा,” असे रामदास आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :