कर्जमुक्ती योजनेचा फायदा गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार-सुभाष देशमुख

मुंबई : राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेमुळे बोगस शेतकरी किंवा अन्य यंत्रणा या योजनेचा पूर्वीप्रमाणे फायदा मिळवू शकणार नाहीत .गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल असा विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला .

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , कर्जमाफीसाठी राज्य सरकारने निकष जाहीर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड टीका केली . मात्र या निकषांमुळे धनदांडगे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवू शकणार नाहीत . २००८-०९ च्या काँग्रेस आघाडीच्या कर्जमाफी योजनेवेळी अनेक श्रीमंत शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले .

खरे तर या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अपेक्षित नव्हते . पण तसे झाले . त्यामुळे फडणवीस सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर करताना काटेकोर निकष लावले आहेत . फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल अशा पद्धतीनेच प्रक्रिया राबविली जात असल्याने त्याचे फायदे धनदांडगे घेऊ शकणार नाहीत .

२००८-०९ च्या कर्जमाफीवेळी केंद्र सरकारने बँकांकडून कर्जदारांची यादी मागविली होती . आता राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवीले . त्यामुळे बँकाही या योजनेचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत . मागच्या कर्जमाफीच्या वेळी बँकांनाही मोठा फायदा झाल्याचे दिसून आले होते. या वेळी तसे होऊ शकणार नाही , असेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...