अदर पुनावालांना धमकी दिल्या प्रकरणी वेगवेगळ्या पक्षांची नावे पुढे येत आहेत ; शेलारांचा गौप्यस्फोट

shelar

मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. सदर वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.

हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’, असं पूनावाला यांनी म्हंटल आहे. यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. असं देखील आदर पूनावाला पुढे म्हणाले होते.

या संदर्भात आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आज गौप्यस्फोट केला आहे. ते बोलताना म्हणाले की, ‘अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे.’

केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे असे शेलार म्हणाले. ‘या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

दरम्यान, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोणी धमक्‍या दिल्यास त्यांनी पोलिस विभागाकडे तक्रार करावी. राज्य पोलिस निश्‍चितच गांभीर्यांने या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कारवाई करतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या