द मम्मी रिटन्स : मुलाच्या नाकर्तेपणामुळे सोनिया गांधींना कॉंग्रेसची धुरा सांभाळावी लागणार

दीपक पाठक : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत न झाल्यानं सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली. गंमत म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तसंच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं.

शनिवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत ही नाट्यमयरित्या अध्यक्षपदाची घोषणा झाली. यावेळी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘काँग्रसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक होऊन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली अशी माहिती दिली.

ही पत्रकार परिषद संपताच सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी काही माध्यमांनी मोठी बातमी म्हणून किंवा ब्रेकिंग न्यूज म्हणून चालविली मात्र यात ब्रेकिंग म्हणून चालवावी एवढी महत्वाची अशी बातमी नव्हतीच मुळी. एका बाजूला प्रकृती साथ देत नसलेल्या सोनिया गांधी यांना मुलाच्या नाकर्तेपणामुळे या वयात देखील पदर खोचून पुन्हा एकदा कॉंग्रेसची धुरा सांभाळावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अतिशय पद्धतशीर गांधी घराण्याच्या हातीच कशी कॉंग्रेसच्या नाड्या राहतील याची व्यवस्था करण्यात आली होती.

कोणताही राजकीय पक्ष हा एका विचारसरणीवर चालत असतो. मात्र काँग्रेसी नेत्यांना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा कधीच विसर पडला असून आता अस्तित्वात असणाऱ्या ‘सो कॉल्ड’ गांधी घराण्याशी निष्ठा असणे हाच एक निकष पक्षात कोणतेही पद अथवा तिकीट देताना पाहिला जात आहे. पक्षात मागे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जेव्हा अर्ज मागविण्यात आले तेव्हा शेहजाद पूनावाला यांनी देखील अर्ज भरला होता मात्र चक्क युवराजांना आव्हान देणाऱ्या पूनावाला याचं पुढे काय झाले हे सर्वाना ठावूक आहे.

कॉंग्रेसच्या दैदिप्यमान इतिहासाचा टेंभा मिरविणाऱ्या डंंगऱ्या नेत्यांनी नव्या पिढीला कधी वर येऊच दिले नाही. ज्यांच्यामध्ये कल्पकता,नेतृत्व करण्याची क्षमता आहे अश्या नेत्यांना कॉंग्रेसने नेहमीच डावलण्याचे काम केले आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिंधिया-पायलट या युवा नेत्यांचे होत असलेले खच्चीकरण. मागे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा विषय सुरु होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना त्यांच्या राज्याची जबाबदारी दिली जाईल असे अंदाज लावले जात होते. मात्र भविष्यात युवराजांची पंतप्रधान होण्याची मनोकामना पूर्ण होताना या दोन युवा नेत्यांकडून आव्हान उभे राहण्याची शक्यता लक्षात घेवून इकडे गेहलोत आणि तिकडे कमलनाथ यांची वर्णी लावण्यात आली.

भारतातील लोकांना नेहमी कुणीतरी महापुरुष जन्माला येईल आणि संकटातून आपणास बाहेर काढेल अशी अपेक्षा असते. रुसलेले राहुल पुन्हा फॉर्मात येतील आणि नामोनिशाण मिटत चाललेल्या कॉंग्रेसला पुन्हा उभारी देतील अशी भाबडी आशा लावून अनेक काँग्रेसी बसलेले आहेत. सिंधिया-पायलट यासारखे प्रतिभावान युवा नेते गांधी घराण्याच्या गुलामगिरीची सवय असलेल्या या मंडळींना राहुल यांच्यामुळे दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत ३ जुलै २०१९ रोजी राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. राजीनामा देवून एवढा काळ लोटला तरीही कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर सक्षमपणे सांभाळू शकेल असा नेता न मिळणे हे खरं तर याच डंंगऱ्या नेत्यांचे अपयश आहे. मात्र हे बोलून दाखविण्याची कोणीही हिम्मत करणार नाही. जो बोलेल त्याची उचलबांगडी होणार हे माहित असल्याने सर्व मंडळी मुग गिळून गप्प बसण्यातच शहाणपण आहे हे ओळखून आहेत.

विरोधी पक्ष विविध मार्ग वापरून पक्षातील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेवून जात असताना एका कणखर आणि नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. जब नाश मनुज पर छाता है,पहले विवेक मर जाता है। असं म्हटलं जातं . २०१४ लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा पाया ज्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात घातला गेला त्याच सोनिया आता पुन्हा हंगामी अध्यक्षा झाल्या आहेत. निष्क्रिय, वृध्द, घराणेशाहीचा वारसा चालविणाऱ्या सोनिया यांची निवड केल्याने सोशल मिडीयावर खिल्ली उडविली जात आहे. तळागळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य आलं आहे. हे काँग्रेसी नेत्यांच्या लवकर लक्षात येवो याच शुभेच्छा …