मुलीची आठवण येते म्हणून आला अन् घटस्फोटीत पत्नीवर अत्याचार केला!

अमरावती : अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील माहेर असलेल्या एका ३२ वर्षीय महिलेचे २०१४ मध्ये पश्चिम बंगालच्या युवकासोबत पुण्यात लग्न झाले. त्यानंतर त्यावेळी ते राहत असलेल्या बिहारच्या पटणा न्यायालयातून घटस्फोट घेतला. त्यानंतर दोन वर्षानंतर घटस्फोटित पतीने अमरावतीत येऊन आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने राजापेठ पोलिसांत दिली आहे. यावरून घटस्फोटित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शहरात राहणारी ही पीडित महिला शिक्षणासाठी २०१० पासून पुण्यात होती. याच दरम्यान, तिची पश्चिम बंगालमधील एका युवकासोबत पुण्यातच ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यामुळेच त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पुण्यातच त्यांनी २३ फेब्रुवारी २०१४ ला लग्न केले. त्यानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली. त्यानंतर ते पतीच्या नोकरीनिमित्त पटना येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊन पटन्याच्या न्यायालयातून त्यांनी घटस्फोट घेतला.

घटस्फोट झाल्यामुळे ही महिला तिच्या मुलीला घेऊन अमरावतीत माहेरी येऊन वास्तव्य करत आहे. ती महिला आता शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, १५ जून २०१९ ला महिलेचा घटस्फोटित पती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अमरावतीत महिलेच्या घरी आला. मुलीची आठवण आली म्हणून आपण मुलीची भेट घेण्यासाठी आलो, असे त्याने महिलेला सांगितले.

त्यामुळे महिलेने त्याला रात्रभर राहण्यास परवानगी दिली. त्याच रात्री त्याने बळजबरीने पीडित महिलेसोबत अत्याचार केला. या प्रकरणी कोणाला काहीही सांगितले तर मुलीला जीवानिशी मारुन टाकेल, अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडीत महिलेने राजा पेठ पोलिसांत दिली.

महत्त्वाच्या बातम्या