मान्सून अखेर केरळात दाखल

टीम महाराष्ट्र देशा : बहूप्रतिक्षित असलेला मान्सून अखेर भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये आज मान्सून ने हजेरी लावत आपल्या भारत दौऱ्याला सुरवात केली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, अखेर आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली.

मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेरीच १ जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभराने आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला.

दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन लांबल्याने महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत १३ जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.