कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मोदी सरकारने सांगितला ‘हा’ उपाय

corona

नवी दिल्ली : पूर्णपणे काळजी घेतली आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट आपण रोखू शकतो. पण सर्व नागरिकांनी कोरोना संबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलं तर हे पुढील लाट रोखता येईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते आहे. या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण वेगाने केले जात आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा मार्ग मोदी सरकारने दिला आहे.

देशात सोमवारपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ८६.१६ लाखांहून अधिक नागरिकांना डोस देण्यात आला. एका दिवसातील ही संख्या पाहता पुढील आठवड्यांमध्ये लसीकरण मोहीम आणखी वेग घेईल, असे पॉल म्हणाले.

लसीकरण वेगाने करणे गरजेचे
देशाची अर्थव्यवस्था आणि कामकाज सुरळीत होण्यासाठी आणि देशाला सक्षम करण्यासाठी लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे. सामाजिक जीवन कायम ठेवणं, शाळा सुरू करणे, उद्योग-व्यवसाय सुरू करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण वेगाने लसीकरण करू आणि नागरिकांनी यात सहकार्य करावे. जगातील इतर लसींप्रमाणेच आपल्या देशातील लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली गेली आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

६ ते ८ आठवड्यात तिसरी लाट येणार-एम्स
देशात पुढील ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. पण सध्या देशातील अवघ्या ५ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे देशाला तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असून कोरोना संसर्ग रोखणं अवघड आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून नागरिकांनी कोणताच धडा घेतला नसल्याचे मतही गुलेरिया यांनी व्यक्त केले. याचा मोठा फटका देशाला बसू शकतो.

महत्वाच्या बातम्या