थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

balsaheb thorat

संगमनेर : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकऱ्यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काढले.

मालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने ऍड. माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

याप्रसंगी बोलताना बघेल म्हणाले की, ‘महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकाराचे मॉडेल सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.’

‘खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर व परिसरासाला वैभवाचे दिवस आल्याचे’ बघेल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या