मोक्कातील गुन्हेगाराचे हातकडीसह घाटीतून पलायन

औरंगाबाद : मोक्कातील कुख्यात गुन्हेगाराने घाटीच्या बाह्यरुग्ण विभागातून सोमवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दोरखंडाची गाठ सोडून हातकडीसह पलायन केले. यामुळे घाटीत एकच धावपळ उडाली. शेख शकील शेख आरेफ (२३, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे पळालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी घाटीत धाव घेतली. शेख शकीलचा पाठलाग करताना व्हॅनवरील चालक जखमी झाला.

गोळवाडी फाट्याजवळ एकाच रात्री दोघांना लुटल्याची घटना मे २०१७ मध्ये घडली होती. या गुन्ह््याचा तपास करताना अवघ्या चोवीस तासात गुन्हे शाखेचे जमादार शिवाजी झिने यांच्यासह अन्य कर्मचा-यांनी शेख शकीलसह त्याचे साथीदार शाहरुख शेख सलाऊद्दीन (२३, रा. उस्मानपुरा) आणि शोएब सलीम कुरेशी (२३, रा. आंबेडकर चौक, चिकलठाणा) यांना पकडले होते. त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला ५० हजारांचे बक्षीस दिले होते. याचवेळी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी देखील तिघांवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघेही संघटीत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून हे तिघेही न्यायाधीन बंदी आहेत.

असा पळाला शेख शकील

हर्सुल कारागृहात बंदी असलेल्या शेख शकील याच्यासह अन्य एका बंदीला घाटीत उपचारासाठी आणायला सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यालयातील सहायक फौजदार ए. एस. पवार यांच्यासह एक महिला व अन्य दोन पुरूष कर्मचारी पोलीस व्हॅनने गेले होते. त्यावेळी तीन गुन्हेगारांना घाटीत तपासणीसाठी पाठवले जाणार होते. मात्र, ऐनवेळी एका गुन्हेगाराला घाटीत न पाठवता दोघांना हर्सुल पोलिसांनी पवार यांच्या स्वाधीन केले.

त्यामुळे पवार आणि महिला कर्मचारी शेख शकीलला घेऊन तर उर्वरीत एका गुन्हेगारासह दुपारी बाराच्या सुमारास पवार पथकासह पोलीस व्हॅनने घाटीत पोहोचले. शेख शकील याच्या उजव्या मानेला गाठ असल्याने त्याला घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात नेण्यात आले. तेथील वॉर्ड क्रमांक ११२ मध्ये गेल्यावर कागदावर खाडाखोड करुन पवार यांना गुन्हेगारासह वॉर्ड क्रमांक १२६ मध्ये पाठवले. तेथेही उपचार होत नसल्याने पवार यांना पुन्हा वॉर्ड क्रमांक १०५ मध्ये पाठविण्यात आले. या वॉर्डात कागदपत्रे गोळा करणे, एसएलआर रायफल सांभाळत असतानाच दोरखंडाची गाठ उकलून शेख शकीलने हातकडीसह पळ काढला.

महत्त्वाच्या बातम्या