दुसऱ्या लाटेत झालेली चूक औरंगाबाद पालिकेने सुधारली, मेल्ट्रान कोविड सेंटरमध्ये तीन प्लांटद्वारे ऑक्सिजन मिळणार!

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. अनेकांवर बेडसाठी वणवण फिरण्याची वेळ आली होती. मात्र आता तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. महापालिकेच्या मेल्ट्रान कंपनीतील कोविड केअर सेंटरसाठी तीन प्लांटद्वारे ऑक्सिजन मिळणार आहे. मेल्ट्रॉनमधील बेडची संख्या ३०० आहे. रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरल्यास ७० ते ८० जम्बो सिलिंडरची गरज आहे. पण हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटद्वारे सुमारे २९० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन तयार होणार आहे. तसेच २० किलोलीटर लिक्विड ऑक्सिजनची याठिकाणी व्यवस्था केली जात आहे.

मेल्ट्रान कोविड हॉस्पिटलमधील सर्वच ३०० बेडसाठी ऑक्सिजन सुविधा देण्यासाठी वर्षभरापासून तयारी केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लिक्विड ऑक्सिजन प्लांट देखील मंजूर करण्यात आला. निधी अभावी रखडलेल्या या प्रकल्पाचे काम सुरू झाले पण हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्पाचा पर्याय समोर येताच लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट रद्द करण्यात आला. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआर फंडातून औरंगाबादसाठी दोन ऑक्सिजन प्लांट मंजूर केले. यातील एक प्लांट सध्या सुरू झाला आहे. दररोज ४० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची या प्लांटची क्षमता आहे.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देखील मेल्ट्रॉनसाठी ऑक्सिजन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. त्याची क्षमता दररोज २५० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. या प्रकल्पासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प सुरू होईल. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सिजनसाठी देखील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरच्या परिसरात टाकी उभारली जाणार आहे. त्यानुसार दररोज २० किलोलीटर लिक्विड ऑक्सिजन मिळणार आहे. ३०० बेडसाठी केवळ ७० ते ८० जेम्बो सिलिंडरची आवश्‍यकता भासणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP