उसाची पहिली उचल हमीभाव दरानुसार – सुभाष देशमुख

ऊस दराबाबत सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

मुंबई: राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सांगितले.सह्याद्री अतिथीगृहात ऊस दराबाबत आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी श्री. देशमुख यांनी ही माहिती दिली.

श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. शेतकरी व साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. साखर कारखान्यातून पहिली उचल हमीभावानुसार दिली जाईल. दुसऱ्या उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. त्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हमीभावापेक्षा साखर कारखान्यांनी अधिक भाव दिल्यास शासनाला कोणतीही अडचण नाही. साखर दर नियंत्रण समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच गुजरात व उत्तरप्रदेश राज्यातील साखर कारखाने देत असलेला हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत अभ्यास करण्यासाठी राज्याचे एक अभ्यास मंडळ त्या राज्यात पाठविण्यात येईल. आणि या अभ्यासमंडळाकडून १५ दिवसात अहवाल मागून या अहवालाचा अभ्यास करून यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. याच बरोबर साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर नेमण्यात येत असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा सुध्दा समावेश करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत विविध शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कारखान्यांच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, इतर प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...