fbpx

साध्वी प्रज्ञासिंहच्या विजयासाठी भाजपने केला हा ‘मास्टर प्लॅन’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन टप्प्यात होणाऱ्या मतदानावर सर्वच राजकीय पक्षांनी लाक्षकेंद्रित केले आहे. विशेष करून भाजप आणि कॉंग्रेसने भोपाळ लोकसभा मतदारसंघात कंबर कसून प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजप कडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळचा गड राखण्याची जबाबदारी दिली आहे तर ३० वर्ष जुन्या असलेल्या भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपने साध्वीला दिग्विजयसिंह यांच्या विरोधात निवडून आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

प्लॅननुसार भाजपकडून दिग्विजय सिंह यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. जेथे काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्या-त्या ठिकाणांवर अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये भाजपकडून प्रचार सभा घेण्यात येणार आहे. खास करून शेवटच्या टप्प्यातील प्रचारची जबाबदारी भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खांद्यावर टाकली आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ह्या वारंवार वादग्रस्त विधान करत आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून त्यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारस केली जात आहे. तसेच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी देखील आहेत. त्यामुळे अशा आरोपी व्यक्तीला उमेदवारी द्यावी का ? असा देखील सवाल कॉंग्रेस कडून विचारला जात आहे. साध्वी यांच्या बाबत एवढी प्रतिकूलता असताना देखील भाजप पक्ष साध्वी यांना निवडून आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.