मतांसाठी जैन धर्मियांचा अनुनय मराठी माणूस सहन करणार नाही

samana news

मुंबई  : मराठी माणसाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जैन धर्मियांचा अनुनय सुरु झाला आहे. मात्र हा अनुनय मराठी माणूस सहन करणार नाही अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’मधून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.

‘सामना’च्या आज प्रसिद्ध झालेल्या संपादकीयामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचण्याचे कारस्थान सुरू झाले. मुंबई आणि अलीकडच्या महापालिका निवडणुकांतही जात आणि धर्माचा विखारी प्रचार झाला. वास्तविक जैन्हणा किंवा बांधव, आम्ही कधीच त्यांच्या अंगावर गेलो नाही. उलट आजपर्यंत सगळ्यांनाच हिंदू म्हणून सांभाळून घेत आलो. मात्र अलीकडे महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत यांची मजल गेली. बाजूच्याच गोव्याला जाऊन जरा बघा. भाजपच्याच राज्यात इथे मुबलक ‘बीफ’ मिळत आहे. इथे महाराष्ट्रात आम्हाला शहाणपणा शिकवणा-यांनी गोव्यात जाऊन पूर्ण शाकाहारी राज्य आणावे. बोला, आहे का हिंमत? इथे तुम्ही एकगठ्ठा मतांची मस्ती दाखवणार असाल तर ती तुम्हालाच लखलाभ ठरो. पण पैशाची मस्ती दाखवून अंगावर याल तर, ते मात्र आता मराठी माणूस सहन करणार नाही.

व्होट बँकेच्या गलिच्छ राजकारणासाठी मनी, मुनी आणि बुवांचा गैरवापर महाराष्ट्रात सुरू झाला आहे. मराठी माणसाला आव्हान देण्यासाठीच ही सगळी थेरं सुरू आहेत. गणराया, हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला पुन्हा एकदा शक्ती दे! मुठभरांच्या धनशक्तीचा माज उतरवण्यासाठी मराठी जनतेला वज्रमूठ आवळून आपले शौर्य आणि तेज दाखवावेच लागेल. गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेश मंडळांनीही यावर जागरण घडवायला हवे.

पुण्यातील गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या बोधचिन्हावरून (लोगो) लोकमान्य टिळकांचे छायाचित्रच हटवण्याचा नादानपणा पुणे महापालिकेने केला. लोकमान्यांसारख्या ज्वलज्जहाल आणि बाणेदार महापुरुषाची ओळख अशी पुसून टाकावी, हे दुर्दैवच म्हणायला हवे! ही वैचारिक दिवाळखोरी आहे. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल करून लोकमान्य टिळकांनी आपल्या अग्रलेखाद्वारे ब्रिटिश सत्तेला हादरा दिला होता. लोकमान्यांचा हा सवाल जगप्रसिद्ध झाला. याच धर्तीवर पुण्याच्या गणेशोत्सवातून लोकमान्यांची आठवण पुसून टाकणा-या पक्षाचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न आज पुण्यनगरीतील पेठा-पेठांतून विचारला जातो आहे.

बुद्धीची देवता असणा-या गणरायानेच या करंटय़ांना आता सद्बुद्धी द्यायला हवी. गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अविभाज्य अंग आहे. ज्ञानाची, बुद्धीची, विद्येची देवता म्हणून चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून हिंदू धर्मात गणपतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापि, संकटांपासून वाचवणारी, अरिष्ट दूर करणारी आणि सर्व विघ्ने दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांची गणरायावर विशेष श्रद्धा आहे. जुनी सरकारे गेली, नवी सरकारे आली त्याबरोबर जुनी संकटे जाऊन नवी संकटे जनतेसमोर उभी ठाकली, असेही सामना ने म्हटले आहे .