पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून ‘मराठा’ समाजाला काहीही मिळाले नाही-विनोद पाटील

औरंगाबाद : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळाले नाही. ही भेट फक्त मराठा आरक्षणासाठी असल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र असे काहीही घडले नाही. यावेळी इतरही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने आता आपले पुढचे धोरण काय हे स्पष्ट करावे. कारण आम्ही आंदोलनाची भाषा केल्याने समाजात वाईट संदेश जात आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी प्रतिक्रिया आर. आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि.८) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र मराठा आरक्षणाबाबत कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. यावर विनोद पाटील यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देतांना सांगितले, ठाकरे- मोदी भेटीत मराठा आरक्षण हा मुद्दा अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता. मात्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये. हे आम्ही स्पष्ट सांगतोय. आम्ही उद्विग्न झालो, समाज रस्त्यावर आला की काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते.

या भेटीनंतर त्यांच्यात कुठली चर्चा झाली हे बाहेर आलेले नाही. कुठलीही ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे समाजाची निराशा झाली आहे. आजचा प्रकार ही तसलाच आहे. बैठक संपेपर्यंत भाबडी आशा होती. आम्हाला वाटत होते काहीतरी होईल मात्र सरकारने काहीही सांगितले नाही वा स्पष्ट केले नाही. त्यामुळे पुन्हा शून्य अशी अवस्था झाली आहे. सरकारने आता त्यांच्या हातात जे आहे ते समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP