गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन पिस्तूल आणि पाच काडतुसांसह तरुणाला अटक

पिंपरी : गणेशोत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने केलेल्या कारवाईत दोन पिस्तूल आणि पाच काडतुस बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट तीनच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. ही कारवाई बुधवार (२३ ऑगस्ट) रोजी करण्यात आली.

गणेश कारभारी साबळे (वय-२८, मु.पानसवादी, ता.नेवासा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आपल्या आरोपीचे नाव आहे.पोलीस नाईक अतुल साठे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी साबळे हा पिस्तुल विक्रीसाठी आला असता त्याला जेरबंद केले.

त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा एक लाख ३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीजवळ शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने त्याच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.