काल अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती ‘या’ व्यक्तीवर

dawood ibahim

नवी दिल्ली – आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यातील एक आरोपी महाराष्ट्रातील आहे असं समजतं.

घातक शस्त्रे हाताळण्यासाठी पाकिस्तानातील प्रशिक्षण शिबिरात 14 ते 15 बांगला भाषकांचा गटदेखील सहभागी झाला होता, अशी कबुली अटक केलेल्या दोन पाकिस्तान्यांनी दिली. देशात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पाकिस्तानात समन्वय प्रस्थापित करण्यात आल्याचं या माध्यमातून उघडकीस आलं. या हल्ल्यांसाठी पाकिस्तानात दोन चमू तयार करण्यात आल्या. यातील एक चमू दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमचा आहे.

हवालाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अनीसवर होती, असं ठाकूर यांनी सांगितले. रामलीला आणि नवरात्रीच्या काळात नेमकी कुठे स्फोटकं पेरायची याची माहिती घेण्याची जबाबदारी दुसऱ्या चमूवर होती. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि काडतुसं जप्त करण्यात आली, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या