आजही माळीणच्या त्या माय-लेकराची ‘घर देता का घर’ची हाक

malin

वेबटीम / माळीन : ३० जुलै २०१४ माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असलेले संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. त्यामध्ये काहींचे संपूर्ण कुटुंब गेले, माळीणच्या त्या दुर्घटनेत कमलबाई जनार्दन लेंभे यांचे डोंगराने घर गिळले . दोन महिन्यांनंतर पतीच्या निधनाने पुन्हा त्यांच्यवर दुःखाचा डोंगर कोसळला. तेवाईकांनीही पाठ फिरविली. निवाऱ्यासाठी शासनाकडून तात्पुरते पत्र्याचे शेड मिळाले. मात्र, निकषांचे कारण पुढे करत नव्या माळीणमध्ये पुनर्वसन टाळण्यात आले. त्यामुळे ‘माळीण’मधील त्या मायलेकांचे निरागस भविष्यच जणू निकषांच्या फेऱ्यात अडकले असून, त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

malin4

कमलबाई जनार्दन लेंभे व किरण जनार्दन लेंभे अशी या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. संततधार पावसामुळे 30 जुलै 2014 साली सकाळच्या सुमारास डोंगरकडा कोसळल्यामुळे पुणे जिल्हय़ातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव गडप झाले. या दुर्घटनेत 151 जणांचे बळी गेले, कित्येक जखमी झाले. तर अनेक घरे अक्षरशः जमीनदोस्त झाली. त्याच्या आठवणी आजही सर्वांना नकोशा वाटतात…! या घटनेतून वाचलेल्या नागरिकांसाठी माळीण फाटय़ावरील शाळेच्या आवारात पत्र्याचे तात्पुरते शेड उभारण्यात आले. या पत्र्याच्या शेडमध्ये कमल जनार्दन लेंभे यांनाही निवारा मिळाला. मात्र, दुर्घटनेत घर उद्ध्वस्त होऊनही पुनसर्वसनातील नव्या माळीणमध्ये घर मिळाले नाही. ग्रामपंचायीत नव्या घराची नोंद नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले. मग शेडमध्ये कोणत्या आधारावर निवारा मिळाला किंवा शासनाच्या जीआरचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

malin 1
३० जुलै २०१४ माळीण गाव

याबाबत बोलताना कमलबाई लेंभे म्हणाल्या, त्या घटनेच्या दिवशी ओढयाला भरपूर पाणी होते. मुलगा किरण पाणी पाहण्यासाठी गेला होता. हे पाणी पाहण्यासाठी त्याने मलाही बोलाविले. मी घरातून बाहेर निघाले. पती जनार्दन लेंभे घरात आंघोळ करीत होते. मुलाने डोंगर खाली आलेला पाहिला आणि ओरडण्यात सुरुवात केली. पती जनार्दन लेंभे बाहेर पडत असतानाच तुळई त्यांच्या अंगावर पडली. त्यांची आधीच एक किडनी काढली होती. या घटनेत डोक्याला व दुसऱया किडनीलाही मार लागला. दोन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचे निधन झाले.

malin2
साखरझोपेत १५१ जणांचा बळी गेला

घटने आधी माळीण गावात 3 खणांचे मोठे घर होते. मोठे दीरही शेजारी राहायचे. घरपट्टी, लाईटबील दोघांच्या नावाने यायचे. घटनेच्या काही महिने आधीच पतीने नवीन घर बांधले होते. पण, ते सरकार दरबारी नावावर करण्यात आले नव्हते. घटनेनंतर मी पतीच्या उपचारांसाठी पुण्यात ससूनमध्ये आले होते. पुनवर्सनात मोठया दिरांना घर मिळाले. पण, उपचारांमुळे मला पाठपुरावाही करता आला नाही. विनंती केल्यामुळे तात्पुरती उभारलेली पत्र्याची एक शेड मला मिळाली. शासन, प्रशासन तसेच राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा करूनही मला नव्या माळीण गावात घर मिळाले नाही. एप्रिल 2017 मध्ये पुनर्वसित माळीणमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये लोक राहण्यास गेले. त्यामुळे पत्र्याच्या शेडमधील बाकीच्या घरांना कुलूप लागले. घर न मिळाल्यामुळे आम्ही मात्र एकटेच पडलो. घरातील वीजही तोडली गेली. विनंतीनंतर वायरमनने ती जोडली खरी. पण आयुष्यातला अंधार तसाच राहिला. येथील लोक नवीन गावांत स्थलांतरित झाल्यामुळे भीतीच्याच छायेखाली जगावे लागते. येथून हाकलल्यानंतर आम्ही रस्त्यावर येऊ. घटनेनंतर नातेवाईकांनीही पाठ फिरविली असून, आता कोणाचाच आधार नाही. लेकरू घेऊन मी कुठे कुठे फिरणार? शासनाने घर द्यावे बाकी काही नको, अशा शब्दांत डोळे पुसतच कमलाबाईंनी आपली कहाणी सांगितली.malin 3मुलगा 11 वीला घटनेनंतर कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. मुलगा किरण हा डिंभेजवळील शिणोली येथील भीमाशंकर कनिष्ठ महाविद्यालयात 11 वीला शिकत आहे. कमलबाई 200 रुपये रोजंदारीवर शेतात कामाला जातात. मुलगा रोज एस टीने महाविद्यालयात जातो. यासाठी रोजचा 66 रुपये खर्च येतो. पोट भागविण्यासाठी मुलगाही कधी कधी रोजंदारीवर जातो. तर होस्टेलसाठी नंबर लागावा, यासाठीही तो प्रयत्न करत आहे. डोंगराने घर गिळले, शासनाने पुनर्वसन टाळले…आता जायचे कुठे, असा प्रश्न या मायलेकांसमोर आहे.

kamlabai lembhe & son
कमलबाई जनार्दन लेंभे व किरण जनार्दन लेंभे

शासनाचा जीआर आणि मग माणुसकीचे काय?
नोंद असो वा नसो. दुर्घटनेत गेलेले घर मिळाले पाहिजे, असा जीआर शासनच काढत असेल किंवा शेड दिले जाते, तर घर का मिळत नाही, असा सवाल ग्रामस्थ सुहास झांजरे उपस्थित करतात. ग्रामस्थांनी मागणी करूनही कमलबाईंना घर नाकारण्यात आले. ग्रामस्थांनाच बांधू द्या, असे सांगितले गेले. नियम, निकष सगळे ठीक आहे. पण, माणुसकीचे काय? निराधार महिलेला अन् तिचे भविष्य असलेल्या मुलाला वाऱयावर सोडणे, ही कसली संवदेशीलता, अशा शब्दांत शासनाच्या असंवेदशीलतेवरच ते प्रकाश टाकतात.