राज्यात महायुतीचचं सरकार येणार, भाजप सर्व्हेनुसार युतीला मिळणार 229 जागा

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्यके राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. मात्र निवडणुकी आधीच निकालाबाबत भाजपने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार भाजप महायुतीला 229 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. तसेच या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीतही भाजप – शिवसेना युती करूनच निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.

2014 साली स्वतंत्र लढलेले शिवसेना – भाजप हे पक्ष यंदाची विधानसभा निवडणूक युतीत लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून 183 जागांचं बहुमत आहे. सर्व्हेच्या आकड्यांनुसार त्यात आणखी 40 ते 50 जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी फक्त 50 ते 60 जागांपर्यंत समाधानी राहणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेदेखील मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा दावा सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून युतीतच संघर्ष होण्याची शक्यता आहे.