महाविकास आघाडी सरकारची फ्युज उडाली आहे; राधाकृष्ण विखेंची ठाकरे सरकारवर टीका!

mahavikas aghadi

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये सामान्‍य माणसाला वीज वितरण कंपनीने सरसकट बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड टाकला आहे. या सरसकट वीज बिलांची वसुली वितरण कंपनींने तातडीने थांबवावी.

ग्राहकांना जादा बिले देऊन सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे. बिघाडी सरकारच्‍या फसव्‍या धोरनांचीच होळी रस्‍त्‍यावर उतरुन करण्‍याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी सरकारची फ्युज उडाली आहे, अशी टीका भाजपाचे जेष्‍ठ नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. लोणी खुर्द येथे वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्‍यात आला. यावेळी आ.विखे बोलत होते.

आ.विखे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्‍त घोषणाबाजी सुरू आहे. सरकारच्‍या कोणत्‍याही धोरणात आणि निर्णयात स्‍पष्‍टता नाही. निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांपासुन जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम राज्यातील मंत्र्यांकडुन केले जाते. वीज बिल माफीची नागरीकांची मागणी दुर्लक्षीत व्‍हावी म्‍हणून अचानक या सराकरने घाईत उर्जा धोरण जाहीर केले.

तुमच्‍या तिजोरीत जर पैसाच नाही, तर मग घोषणा करता कशाला? असा प्रश्‍न उपस्थित करुन आमदार विखे पाटील म्‍हणाले की, काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे, हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्‍याचा प्रयत्‍न आहे. राज्‍यातील जनतेशी केलेल्‍या विश्‍वास घातामुळे या सरकारची फ्यूजच उडाली असल्‍याची खरमरीत टीका विखे पाटील यांनी केली आहे.

यावेळी वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपा कार्यकर्त्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, बापूसाहेब आहेर, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राम्‍हणे आदी उपस्थित होते. राहाता तालुक्‍यातील विविध गावांमध्‍येही भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात आक्रोश व्‍यक्‍त केला आहे.

महत्वाच्या बातम्या