देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरला, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

rahul gandhi

नवी दिल्ली : देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत नऊ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता करोनानं ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात दिवसाला आठ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्राच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. दरम्यान,महाराष्ट्रात परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्राबद्दल राहुल गांधींनी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ही टीका केली असली तरीही एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. भारतात कोरोनोबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी एक दिलासादायक बातमी म्हणजे रिकव्हरी रेट. भारतात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, याचा अर्थ भारताचा रिकव्हरी रेट हा 48% आहे. असे असले तरी देशातील 17 जिल्ह्यांमध्ये 20% जास्त पॉझि़टिव्ह रुग्ण आहेत.

‘तळमळीनं भाषणं करून लोकांना मदत होत नाही’

अभिमानास्पद : कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बनले कोरोना योद्धा !

#coronavirus : देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद : पंतप्रधान नरेंद्र मोदी